हृदयाची तार छेडणारं गाणं : कदले कदले

        सध्या OTTचा जमाना आहे. दिवसेंदिवस नवनवीन सिनेमा व वेब मालिका येतायत. पण त्यातील खूपच कमी हृदयाला स्पर्श करतात आणि हृदयस्पर्शी गाणी तर त्याहूनही कमी. अशाच हृदयस्पर्शी सिनेमांपैकी पैकी एक '96' व त्यातीलच 'कदले कदले'( माझ्या प्रेमा) हे गाणे. हा सिनेमा तमिळ भाषेतला. आपल्या हृदयस्पर्शी कथानकाने व विजय सेतुपतीच्या नैसर्गिक अभिनयाने त्याने भारतातील सर्व सिनेमा प्रेमींच्या मनात भुरळ घातली. इतकेच काय तर त्याचे मराठी, कन्नड व तेलगु मध्ये रिमेकही निघाले आहेत.  

         सर्वच लोक स्वप्न पाहतात. स्वप्नांसाठी जगतात. जगण्याच्या प्रमुख आधारांपैकी स्वप्न हे एक आहे. हे गाणं असेच एक स्वप्न सांगतंय. स्वप्न....वास्तवाशी हजारपट दूर असलेलं, पण अंतर्मनाला सुखावणारं स्वप्न. या गाण्यातील संगीत अत्यंत हळूवार आहे व तितकाच चिन्मयीचा आवाजही. गाण्याची सुरुवात सुरावटीने होते व बासरीचा मोहक आवाज हृदयाची तरलता दाखवतो. हे सर्व कमीच की काय म्हणून हृदयातील अगदी आतील कोपर्‍याला स्पर्श करणारा आलाप येतो आणि गाण्याचे बोल सुरू होतात. 

       कार्तिक नेठाने लिहिलेले हे गाणे इतर गाण्यांच्या तुलनेत बरंच छोटं आहे. पण अर्थांच्या विविध छटांनी पुरेपूर भरलेलं आहे. ह्या गाण्याचा स्वतःचाच असा एक दर्द आहे व तो प्रत्येक बोलागणिक वृद्धिंगत होत जातो. पहिल्या कडव्यातील संगीतात हळूहळू नैसर्गिक आवाजांचा प्रवेश होतो व मन नकळतच निसर्गरम्य ठिकाणी पोहोचतं. त्यानंतर सुरू होते व्हायोलिन सोनाटा अर्थात व्हायोलिनसाठीची एक संगीत रचना ज्याला कीबोर्ड वाद्याची‌ साथ असते. गोविंद वसंत यांनी नैसर्गिक आवाज व व्हायोलिन सोनाटा यांना अत्यंत सुंदर रित्या गुंफलेले आहे. ही त्यांची संगीत रचना गाण्याला एका नव्या उंचीवर नेऊन ठेवते. या गाण्याचे एक ठळक वैशिष्ट्य बनते.

       दुसऱ्या कडव्यात संगीत वेग पकडतं. त्याच वेगाने गाणं पुढे जायला लागतं. गाण्याच्या बोलांमध्ये प्रेमिक व प्रेमिका स्वतःसोबत प्रवास करण्याची साद घालतात. वाटतं जणू काही गाण्याचा मध्य आला आहे, पण दुसऱ्या कडव्या नंतर एका मागून एक येणाऱ्या लाटांच्या आवाजा सोबत गाणं अचानक संपतं. प्रत्यक्षात जरी गाणं संपलं असलं तरी अंतर्मनात अखंडित लाटा उत्पन्न होतात आणि त्यांचा दिलेल्या सादेला प्रतिसाद देत अखंडित प्रवास सुरू होतो. हे गाणे पुन्हा पुन्हा ऐकताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते की या गाण्याला नियमांच्या चाकोरीत बसणारी ना सुरुवात आहे, ना शेवट आहे. हे गाणं एक प्रवाह आहे, जो अखंडित वाहत राहतो.

      प्रत्येकाने डोळे बंद करून एकदा तरी हे गाणं ऐकायला हवे. हे गाणं हृदयात एक खळबळ निर्माण करतं व त्याच बरोबर अंतर्मनाला एक वेगळ्याच प्रकारची शांतताही प्रदान करतं. 

या गाण्याच्या निर्मितीत सहभागी असलेल्या सर्व कलाकारांना अंत:करणापासून सलाम!

                                                            

                                                          - क्रांतदर्शी मिरजकर

टिप्पण्या